बेळगाव लाईव्ह : जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून सर्वसामान्य जनतेला काँग्रेस सरकार लुटत आहे. तर दुसरीकडे सरकारी तिजोरीची लूट सुरु आहे. काँग्रेस सरकार महाराष्ट्र राज्यासह इतर चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पैसे वसूल करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला.
आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार हे अलीबाबा आणि चाळीस चोर याप्रमाणे आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. दुधाच्या दरात झालेली वाढ हि सर्वसामान्यांसाठी त्रासदायक आहे.
भाजपच्या कार्यकाळात इंधनाच्या दरात किरकोळ वाढ झाली त्यावेळी याच सिध्दरामय्यांनी खांद्यावरून दुचाकी घेऊन सरकारची अंत्ययात्रा काढली. आता काँग्रेस सरकारकडून होत असलेली दरवाढ पाहून भाजपने कोणती यात्रा काढायची? असा प्रश्न आर. अशोक यांनी उपस्थित केला.
इंधनदारवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ हि सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. आधीच त्रस्त झालेल्या जनतेला आणखीन त्रासात ढकलण्याचे काम काँग्रेस सरकारकडून होत आहे.
अचानकपणे दुधाच्या दरात झालेली वाढ हि गरीब जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका आर. अशोक यांनी केली. काँग्रेस सरकारच्या या दरवाढीच्या धोरणामुळे जनतेचा शाप काँग्रेसला नक्कीच भोवणार आणि लवकरच राज्यातील काँग्रेस सरकार कोसळेल असा दावा आर. अशोक यांनी केला.