बेळगाव लाईव्ह :कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात आज बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन छेडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
राज्यातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पेट्रोल व डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. भाजप नेते महांतेश कवटगीमठ, विधान परिषद सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना महांतेश कवटगीमठ यांनी राज्यातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डिझेलचा दर 3 रुपये आणि पेट्रोल दर 3.50 रुपये आणि वाढवला आहे. याच्या निषेधार्थ आम्ही बेळगाव जिल्हा भाजपातर्फे सरकारचा निषेध करत आहोत. गेल्या वर्षभरापासून समाधानकारक पाऊस झालेला नाही.
तसेच सर्व गोष्टींचे दर वाढले आहेत. या परिस्थितीत शेतकरी आणि सामान्य नागरिकांना डिझेल व पेट्रोलची दर वाढीमुळे आणखी त्रास होणार आहे असे सांगून तेंव्हा पेट्रोल व डिझेल दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे असे कवटगीमठ यांनी सांगितले.
यावेळी बोलताना विधानपरिषद सदस्य इराण्णा कडाडी यांनी देखील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध केला. त्याचप्रमाणे या दोन्ही इंधनांची दरवाढ कमी करण्याबरोबरच सरकारने एमएसएमइ क्षेत्रातील वीज दरवाढ सरकारने त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली.
तसेच राज्य सरकारने विविध गोष्टींच्या बाबतीत केलेल्या दरवाढीचे माहिती देऊन या दरवाढीद्वारे राज्यातील काँग्रेस सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे असा आरोप कडाडी यांनी केला.