बेळगाव लाईव्ह :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे आणि अति उत्साही पर्यटकांना चाप लावणे या उद्देशाने वनविभागाने अंबोली येथे अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सावधपणे पर्यटनाचा आनंद लुटावा लागणार आहे.
आंबोली घाट व धबधबा परिसर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असल्यामुळे या ठिकाणी कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपण करणे मद्यपान करणे, यासारख्या निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा पथदर्शी निर्णय वनविभागाने घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे, माकड वगैरे वन्य प्राण्यांना खाऊ घालणे, त्यांची छेडछाड करणे, मद्यपान करणे, सोबत मद्य बाळगणे, यामधील प्रत्येक कृत्यासाठी 1000 रुपये त्याचप्रमाणे धूम्रपान करताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
याखेरीज दुसऱ्या वेळेला नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर वन कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविला जाणार आहे. त्या अनुषंगाने कारवाई सुरू झाली असून गेल्या 15 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 11,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गोवा सरकारने देखील सर्व धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती. त्यानंतर कमी जोखमीचे 14 धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असे असले तरी बंदी असो वा नसो सिंधुदुर्गातील आंबोली आणि मांगेली येथील धबधब्यांवर जाण्यामध्ये पर्यटकांची संख्या मोठी असते. तथापि या वर्षापासून सिंधुदुर्ग वनविभागाने अनेक निर्बंध लागू केल्याने पर्यटकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
दरम्यान आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधता टिकवण्यासाठी मनाई करण्यात आलेली कृत्य कोणी करत असेल तर त्याला प्रतिबंध करून उपस्थित वनाधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. कोकणचे वैभव असलेल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन सावंतवाडी उपवनसंरक्षणाधिकारी नवकिशोर रेड्डी यांनी केले आहे.