बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रहदारी नियंत्रणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून रहदारी पोलीस मोहीम आखत आहेत. सर्वप्रथम रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वन वे मार्ग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि नियमबाह्य नंबरप्लेट लावून वाहने चालविणाऱ्या दुचाकीधारकांवर कारवाई.. यानंतर आज कॉलेज रोडवरील दुहेरी बाजूने पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कॉलेज रोडवर लिंगराज महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांना ‘बेड्या’ ठोकत रहदारी पोलिसांनी आज कारवाई केली. या भागात असणाऱ्या रुग्णालयासमोर सातत्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
लिंगराज महाविद्यालयासमोर असलेल्या वलनामुळे तसेच पोलीस आयुक्तालय आणि आसपास असलेल्या शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या पार्किंगमुळे अनेक समस्या उद्भवत होत्या.
शिवाय सन्मान हॉटेल नजीक घालण्यात आलेल्या बॅरीकेड्समुळे याच वळणावरून अनेक वाहने देखील वळून पुढे मार्गस्त होतात.
याच मार्गावरून पुढे यंदे खूट जवळ असलेल्या सिग्नलच्या आसपास देखील बेशिस्तपणे वाहने पार्किंग करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
हीच बाब लक्षात घेत आज रहदारी पोलिसांनी वाहनांवर कारवाई करत वाहने लॉक केली आहेत.