बेळगाव लाईव्ह : महापालिकेच्या इतिहासात स्थायी समिती साठी कोणताही गट सत्तेत असला तरी आत्तापर्यंत चार तीन असे समीकरण होते. आता पहिल्यांदाच भाजपच्या कारकिर्दीत पाच दोन असे स्थायी समितीचे समीकरण असण्याची शक्यता आहे. अर्थात सत्ताधारी गटाचे पाच सदस्य आणि विरोधी गटाचे दोन सदस्य एकाच स्थायी समितीवर नियुक्त केले जाऊ शकतात.
महापालिकेत दोन जुलै रोजी चार स्थायी समितीची निवडणूक होणार आहे. महापालिका सभागृहात भाजपचे बहुमत असल्यामुळे या स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व असणार आहे. यावेळी भाजपने पारंपरिक पायांना मोडून सत्ताधारी पाच आणि विरोधी गटाचे दोन असा नवा फॉर्मुला तयार केल्याचे समजते.
महापालिकेवर सुरुवातीपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता राहिली आहे. आपल्या सत्तेच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीने स्थायी समितीमध्ये विरोधी गटालाही चांगले स्थान दिले होते. आपले चार आणि विरोधी गटाचे तीन सदस्य निवडण्यात येत होते.
पण यावेळी भाजप हा पायंडा मोडण्याच्या तयारीत आहे. विरोधी गटाला केवळ दोन जागा देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. बहुमताच्या जोरावर भाजप चारही स्थायी समितीवर एकहाती सत्ता मिळवू शकते. कशी सत्ता महाराष्ट्र एकीकरण समिती सुद्धा मिळवू शकली असती. पण त्यांनी विरोधी गटाला सन्मान दिला होता. आता मात्र सत्ताधारी भाजप नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहे.