बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील येडीयुरप्पा मार्गावरील महाराजा वाईन शॉप येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातून संशयित आरोपी मंगेश राजेंद्र हसबे (वय 24, रा. वझे गल्ली, वडगाव -बेळगाव) याची बेळगाव येथील दहाव्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर घटनेची माहिती अशी की, गेल्या 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7:20 वाजता सदर प्रकरणातील मयत सुरज गौंडाडकर हा दारू पिण्यासाठी येडीयुराप्पा मार्ग येथील महाराजा वाईन शॉप येथे गेला होता. त्यावेळी संशयित आरोपी मंगेश हसबे हा आपल्या दोन मित्रांसोबत रात्री 8 वाजता त्याच वाईन शॉपमध्ये दारू पिण्यास आला.
त्यानंतर काही कारणास्तव सुरज आणि आरोपी मंगेश यांच्यामध्ये वादावादी झाले आणि मंगेश याने सुरज याच्या कानशिलात भडकावले. तेंव्हा वाईन शॉपचे मालक पवन धोंगडी व वेटर भांडण सोडवण्यासाठी आले. तसेच त्यांनी सुरज याला वाईन शॉप मधून बाहेर जाण्यास सांगितले.
त्यानंतर रात्री 9:20 वाजता संशयित आरोपी देखील वाईन शॉप मधून बाहेर पडला. वाईन शॉप मधून बाहेर आल्यानंतर सुरज व मंगेश यांच्यामध्ये पुन्हा भांडण होऊन त्याचे पर्यवसान सुरजचा चाकूने भोसकून खून करण्यामध्ये झाले होते. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
सीसीटीव्हीचे फुटेज देखील न्यायालयात हजर करण्यात आले होते. याव्यतिरिक्त सरकारी पक्षातर्फे 72 कागदपत्री पुरावे, 26 साक्षीदार, 5 मुद्देमाल हजर करण्यात आले होते.
मात्र साक्षीदारातील विसंगतीमुळे मंगेश राजेंद्र हसबे याची न्यायाधीश आणि निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्रताप यादव ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. स्वप्निल नाईक यांनी काम पाहिले.