बेळगाव लाईव्ह : चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या समस्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. खासदारांच्या चिक्कोडी येथील कार्यालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
कार्यालयाशी संबंधित काही किरकोळ कामे आहेत. तीन ते चार दिवसांत कार्यालयाचे काम पूर्ण होणार असून येत्या काही दिवसांत तेथे बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी चिक्कोडी मतदारसंघातील विविध भागांतून आलेल्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांच्याशी चर्चा केली.
कवटगीमठ शहरातील गृहकचेरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर प्रथमच मी लोकांच्या समस्या ऐकल्या. चिक्कोडी मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांनी आज आपल्या समस्या सोडविण्यासाठी निवेदने सादर केली आहेत. मी टप्प्याटप्प्याने जनतेच्या समस्या पूर्ण करणार आहे.
यावेळी स्वतंत्र चिक्कोडी जिल्ह्यासंदर्भात देखील खास. प्रियांका जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून चिक्कोडी हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. याबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे निर्णय घेणार आहेत, अनेक दिवसांपासून स्वतंत्र चिक्कोडी जिल्ह्याची मागणी होत असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
चिक्कोडी भागातील सैनिकांच्या समस्यांना देखील मी मनापासून प्रतिसाद देईन. तसेच या भागात पिण्याचे पाणी व सिंचन प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जाणार असून, पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडेदेखील लक्ष दिले जाईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी सतीश शुगर्सचे संचालक, युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.