बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर येथे छत्रपती शाहू भवन आणि बेळगाव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह निर्माण करण्यासाठी माजी आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजश्री शाहू महाराज जयंती सोहळा देखील करण्यात आला. यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेची सदस्य मिळून चालू करण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बेळगाव तालुका क्षत्रिय मराठा परिषद समितीची स्थापना करण्याचा देखील आदेश यावेळी देण्यात आला. एसएसएलसी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी सल्ला घेण्यात आला आणि उर्वरित निधीबद्दल चर्चा करण्यात आली. निधी कमिटीसाठी विशेष कमिटीची नेमणूक करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, मराठा समाजाची स्वतंत्र अशी इमारत बेळगावमध्ये नाही. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील मराठा बांधवांसाठी इमारत उभारणे गरजेचे असून यासाठी मराठा समाजातील प्रत्येकाने सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
ऍड. अमर येळ्ळूरकर बोलताना म्हणाले, कर्नाटकात २० ते २५ लाख मराठा समाजाचे लोक आहेत. आपल्या समाजाची बेळगावमध्ये हक्काची जागा हवी यासाठी अनेक वर्षांपूर्वी बेळगावमध्ये जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेवर इमारत बांधून मराठा समाजातील गोर गरिबांना, समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची, वसतिगृहाची सोय व्हावी हा उद्देश आहे. बेळगावमध्ये आज अनेक संस्था आहेत. परंतु विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सोय त्याठिकाणी नाही. १९०५ साली कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी ही सुविधा बहुजन समाजासाठी सुरु केली होती.
याच धर्तीवर बेळगावमध्येही मराठा समाजाच्या उन्नतीसाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे, यासाठी मराठा समाजाने एकत्र येऊन, कर्नाटक मराठा क्षत्रिय समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार बैठक घेऊन चर्चा करणे, आणि लवकरात लवकर इमारत उभारणीसाठी प्रयत्न करणे तसेच विविध उपक्रम राबवून मराठा समाजाला एकत्रित आणणे गरजेचे आहे असे मत ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केले.
या बैठकीला कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाचे विविध पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी एस एस मोरे बसवराज म्यागोटी पीएम जगताप दिलीप पवार वाय एस चौगुले जाधव सदानंद, सुनील डोंगरे मारुती झोळी राहुल पवार रोहन कदम परशुराम कोपपद संजीव भोसले डी बी पाटील पुंडलिक पट्रोट श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.