बेळगाव लाईव्ह : संपूर्ण शहराच्या आणि उपनगरातील स्वच्छतेची जबाबदारी वाहणाऱ्या स्वच्छता कर्मचारी कार्यालयाला महापौर सविता कांबळे यांनी आज पहाटे ५.३० च्या दरम्यान अचानक भेट दिली.
आझम नगर येथील स्वच्छता कर्मचारी कार्यालयात अचानक भेट देऊन महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी केली. शहराच्या स्वच्छतेचे कामकाज सुरळीत चालावे, सफाई कामगारांनी जबाबदारीने काम पार पाडावे, नागरिकांना उत्तम सेवा मिळावी या अनुशंगातून महापौरांनी सूचना केल्या.
सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ, कार्यालयात बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर, नियुक्त केलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा यासह अनेक गोष्टींची तपासणी करत सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.
अचानकपणे कार्यालयात धडक दिलेल्या महापौरांना सफाई कर्मचाऱ्यांनी समस्या सांगितल्या. या समस्यांचा आढावा घेतल्यानंतर महापौरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना समस्या सोडविण्याची ग्वाही देत यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी ज्याठिकाणी कचरावाहू वाहने उभी केली जातात, त्याठिकाणी भेट देऊन वाहनांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मोडकळीस आलेली वाहने तसेच नादुरुस्त परिस्थितीत असलेल्या वाहनांबाबत काही सूचनाही केल्या.
यावेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी, प्रवीण पाटील, आरोग्य स्थायी समिती सदस्य कलादगी, पर्यावरण अभियंता, नगरसेवक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.