बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज झालेल्या अग्नीवीरांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज मंगळवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.
मराठा सेंटरच्या परेड मैदानावर आयोजित या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीवीरांनी लष्करी वाद्य वृंदाच्या तालावर शिस्तबद्ध अशा शानदार पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिल्यानंतर पाहुण्यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर भारतीय लष्करात सामील होणाऱ्या अग्नीवीरांना राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने देश संरक्षण आणि निर्माण याची शपथ देवविण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी प्रारंभी दीक्षांत समारंभ शिस्तबद्धरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व अग्नीवीरांचे अभिनंदन केले. ही खूप अभिमानाची बाब आहे की आपण सर्वांनी इतक्या कमी वेळेत इतक्या उत्कृष्ट ताळमेळाचे प्रदर्शन घडविले जे खरोखरच प्रशासनीय आहे.
या सुवर्ण क्षणाप्रसंगी तुमचे आई-वडील आणि नातेवाईकांचेही मी अभिनंदन करू इच्छितो. ज्यांची तपस्या, आशीर्वाद आणि मेहनतीमुळे तुम्ही आज या पदावर पोहोचला आहात. आतापर्यंत मी तुम्हाला खाकी गणवेशात पाहत होतो. मात्र आज तुम्ही लष्कराच्या हिरव्या गणवेशात माझ्यासमोर उभे असल्याचे पाहून मोठा उत्साह व गर्व वाटतो. तुम्हाला आणि तुमच्या माता- पित्यांनाही माझ्यापेक्षा जास्त गर्व वाटत असावा. फक्त मराठा लाईट इन्फंट्री नाही समस्त भारतीय सेनादलातर्फे मी तुमचे आमच्या गौरवशाली रेजिमेंटमध्ये स्वागत करत आहे.
कालपर्यंत तुम्ही एक सामान्य नागरिक होता मात्र आजपासून एक प्रशिक्षित अग्नीवीर म्हणून ओळखले जाल. या प्रवासात तुम्ही कठोर परिश्रम आणि तपस्येच्या जोरावर आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या समोरील अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा तुम्ही निडरतेने सामना केला आहे. त्यासाठी मी तुम्हाला शाबासकी देतो, असे ब्रिगेडियर मुखर्जी पुढे म्हणाले.
आजचा दिवस हा भारतीय सेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज संपूर्ण देशात हजारो प्रशिक्षित अग्नीवीर विभिन्न प्रशिक्षण संस्थांमधून एकाच वेळी भारत मातेची सुरक्षा, एकता, अखंडता आणि समृद्धता अबाधित राखण्याची शपथ घेत आहेत. फक्त देशाची सुरक्षाच नाही तर देश निर्मितीमध्येही तुम्हाला योगदान द्यायचे आहे. लक्षात ठेवा तुमची लाखो जणांमधून निवड करण्यात आली आहे. कारण तुमच्यात ते गुण आहेत जे सामान्य नागरिकांमध्ये नाहीत. आजच्या परेड मधील तुमचा जोश, जुनून व जजबा आणि एकमेकांमधील समन्वय हे दर्शवतो की गेल्या सात महिन्यातील तुमचे प्रशिक्षण हे किती उच्च दर्जाचे होते.
मला पूर्ण विश्वास आहे की येत्या 4 वर्षात तुम्ही एक सच्चे देशभक्त अग्नीवीर म्हणून राष्ट्र निर्माणामध्ये शत प्रतिशत योगदान द्याल. आज तुम्ही राष्ट्रध्वज व रेजिमेंटच्या ध्वजाला साक्षी मानून शपथ घेतली आहे. राष्ट्रध्वज हा आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणेचा स्त्रोत आहे. मराठा रेजिमेंटच्या ध्वजावरील निशान गाजलेल्या लढायांचे स्मरण करून देते. या लढायांमध्ये आपल्या पूर्वजांनी देश सेवा आणि सैनिक गर्व याचे अप्रतिम उदाहरण देताना रेजिमेंटचे नांव आणि निशान कायम उंचावत ठेवले आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचे स्त्रोत आहे. मराठा रेजिमेंटल सेंटरचे अग्निवीर होण्याच्या नात्याने तुम्हा सर्वांचे दायित्व आहे की आपल्या रेजिमेंटचा महान व गौरवशाली इतिहास तसेच भारतीय सेनेचा परमपराक्रम आणखी उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. तुम्हाला मिळालेले प्रशिक्षण हे फक्त येत्या 4 वर्षासाठी नाही तर तुमच्या पुढील संपूर्ण आयुष्यासाठी एक उत्तम नागरिक बनण्यासाठी देण्यात आले आहे. मला विश्वास आहे की तुम्ही ती अपेक्षा पूर्ण कराल. आज शपथ घेताना तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की सर्व आदेशांचे पालन करू मला पूर्ण खात्री आहे की मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या अनुभवी प्रशिक्षकांनी तुम्हाला उच्च कोटीचे प्रशिक्षण देऊन प्रत्येक कार्य यशस्वी करण्यास सक्षम बनवले आहे. कांही दिवसातच तुम्ही आपापल्या युनिट्सना जाल.
मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर समय सूचकतेने मेहनत, एकाग्रता आणि इमानदारीने एक आदर्श अग्निवीर होण्याचे उदाहरण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून तुमचे भविष्य फक्त सेनेपुरते नव्हे तर सेनेबाहेरही उज्वल राहील, असे आश्वासन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी देश सेवेसाठी सज्ज झालेल्या अग्निविरांना दिले. दीक्षांत सोहळ्यास मराठा सेंटरच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह निमंत्रित आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीवीरांचे नातलग बहुसंख्येने उपस्थित होते.