बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या २ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी शिरल्याने पहिल्याच पावसात शहराची दाणादाण उडाली आहे.
दरम्यान शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाचे वाभाडे निघाले असून गटारी ओव्हरफ्लो झाल्याने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह शुक्रवारपासून मान्सूनने दमदार एंट्री घेतली असून या पावसाने बेळगावकरांना चांगलेच झोडपले आहे. दमदार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता.
मान्सूनपूर्व पाऊस की मान्सूनचे आगमन या संभ्रमावस्थेत जनता आहे. यावर्षी वळिवानेही दमदार हजेरी लावली. त्यानंतर आता मान्सूनचेही लवकरच आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावातही मान्सून आला का? याची चर्चा सुरु असून पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. मात्र सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शनिवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते मात्र त्यानंतर दुपारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शहरात अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. गोवावेस येथील मनपा संकुल, भाग्य नगर अनगोळ वडगाव परिसर, शहरातील विविध गल्ल्या यासह कित्येक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या अशास्त्रीय कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे.
गटारी तुडुंब भरल्याने, काही ठिकाणी गटारी नसल्याने रस्त्यावरूनपाणी वाहत होते. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सुरु झालेल्या पावसानंतर तब्बल दोन तासाहून अधिकवेळ पाऊस सुरूच होता. या पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेक गटारींमध्ये कचरा साचून गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. दमदार पावसामुळे बाजारपेठेतील बैठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. याचबरोबर दुचाकीस्वार,पादचारी यांनाही या पावसाचा फटका बसला.
शहर तसेच उपनगरांमध्ये कित्येक ठिकाणी गटारी स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणी गटारीच नाहीत. त्यामुळे पाण्याला पुढे जाण्यासाठी वाटच नसल्याने अनेकांच्या कंपाऊंडमध्ये पाणी शिरत आहे. पहिल्याच पावसाने साऱ्यांची तारांबळ उडत असून मान्सूनचे आगमन झाले तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेव्हा महानगरपालिकेने आताच लक्ष देऊन गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पावसाचे आगमन होत आहे. त्यानंतर बराचवेळ पावसाची रिपरिप होत आहे. यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून राहत आहे. सध्या शेतकऱ्यांनी काही भागामध्ये पेरणी केली आहे. तर काही भागात मशागतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. भातपेरणी करून काही भागात उगवणही झाली आहे. त्यांना हा पाऊस फायदेशीर ठरला. पावसाने विश्रांती घेतली तर इतर कामांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे.