बेळगाव लाईव्ह: मंगाई नगर वडगाव येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. उदय गुरुराज सेठ (वय ४९) राहणार मंगाई नगर वडगाव (मूळ गाव उत्तर कन्नड जिल्हा) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय हा तलावाकडे फिरायला गेला असता पाय घसरून तो तलावात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी धाव घेत सायंकाळपर्यंत तलावात बुडालेल्या उदयचा मृतदेह बाहेर काढला असून याप्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शनिवारपासूनच बेळगाव शहर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहर परिसरातील सर्व तलाव, नदी, नाले, विहिरी या पावसामुळे प्रवाहित होणार आहेत. यामुळे अशा परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
मंगाई नगर तलावात पाणी असून जनावरे धुण्यासाठी किंवा इतर कामासाठी या पाण्याचा वापर होत असतो या तलावा परिसरातून ये जा करण्यासाठी देखील वावर असतो.