बेळगाव लाईव्ह : लघुपाटबंधारे खात्यातर्फे हालगा गावाजवळ पाणी पुरवठा योजनेसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या तलावासाठीच्या भूसंपादनासंदर्भात आज शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी सदर योजनेसाठी आपल्या शेतजमिनी देण्यास तीव्र विरोध दर्शविला.
लघुपाटबंधारे खात्याने हालगा गावाजवळील सुमारे 74 एकर शेत जमिनीमध्ये तलावाची निर्मिती करून परिसरातील गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना आखली आहे.
सदर योजनेसाठी निश्चित केलेल्या 74 एकर क्षेत्रातील शेतजमिनी रीतसर ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी तलावाची खुदाई करून पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने शेत जमिनीत ताब्यात घेण्यासंदर्भात आज प्रथम हलगा व परिसरातील संबंधित शेतजमीन मालकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बागेवाडी सर्कल एस. आर. गुरव यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशावरून हालगा गावाजवळील नियोजित पाणी पुरवठा योजना जमीन मालक शेतकऱ्यांना मान्य आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. आत्ताच झालेल्या बैठकीत मी शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली आहेत. त्याची माहिती तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तहसीलदार निर्णय घेतील अशी माहिती देऊन माझं काम या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची मते जाणून घेणे हे होते हे मी पूर्ण केले आहे. आता नियोजित तलावाद्वारे पाण्याचा किती साठा केला जाईल? किती गावांना पाणी पुरवले जाईल? या तांत्रिक बाबी लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येतात त्याबद्दल मला माहित नाही, असे गुरव यांनी सांगितले.
यासाठी बागेवाडी सर्कल एस. आर. गुरव आणि हालगा गावच्या तलाठ्यांनी आज गुरुवारी सकाळी तलावासाठी आवश्यक असणाऱ्या शेतजमिनीची पाहणी करून तिथून जवळच एका ठिकाणी जमीन मालक शेतकरी आणि गावातील प्रमुख नागरिकांची बैठक घेतली. यावेळी सर्कल गुरव यांनी हालगा गावाजवळ तलाव खोदून राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या जमिनीसंदर्भात माहिती दिली.
तसेच या योजनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी त्यांची किंमत बाजारभावानुसार जमीन मालक शेतकऱ्यांना अदा केले जाईल, असे स्पष्ट केले. तथापि त्याला उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून तलावाच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी देण्यास नकार दिला. बैठकीस बरेच शेतकरी उपस्थित होते.