Sunday, December 22, 2024

/

केएमएफने दुधाच्या प्रमाणासह दरात देखील केली वाढ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महामंडळाने म्हणजेच केएमएफने प्रति लिटर मागे दोन रुपयांची वाढ केली आहे. केवळ दुधाच्या दरात वाढ करण्यात आली नसून दुधाच्या प्रमाणात देखील वाढ करण्यात आली आहे.

यानुसार प्रत्येक पाकिटात ५० मिली दूध देखील अतिरिक्त देण्यात येणार असून हा बदल बुधवारपासून लागू करण्यात येणार आहे. याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले असून प्रति युनिट दुधाच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, परंतु वाढलेल्या किमतीसह दुधाच्या प्रमाणात देखील वाढ करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली दुधाच्या पॅकेटची जागा 550 मिली दुधाच्या पॅकेटने घेतली जाईल आणि एक लिटरच्या पॅकेटची जागा 1,050 मिली दुधाच्या पॅकेटने घेतली जाईल. यानुसार प्रमाणासह दरात देखील वाढ होईल.

कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध उत्पादन संकलन केंद्रांवर नाकारले जाणार नाही याची खात्री करणे असून गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील दूध उत्पादनात १५ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी सरासरी दैनंदिन उत्पादन ९० लाख लिटर होते, तर यंदा ते सरासरी ९९ लाख लिटर प्रतिदिन झाले आहे.

या अतिरिक्त उत्पादनाला सामावून घेण्यासाठी आणि शेतकरी पाठ फिरवू नयेत याची खात्री करण्यासाठी, केएमएफने प्रत्येक पॅकेटमधील दुधाचे प्रमाण 50 मिलीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अतिरिक्त दुधासाठी 2 शुल्क आकारण्यात येणार असून दुधाच्या प्रति युनिट दरात कोणतीही वाढ झालेली नाही.Kmf

इथून पुढे 1000 मिली दुधात 50 मिली दूध अतिरिक्त देण्यात येईल. यासाठी सध्या 44 रुपये प्रतिलिटर असलेला एक लिटर दुधाचा दर बुधवारपासून 46 रुपये होणार आहे. एक लिटरऐवजी 1050 मिली दुधाचे पाकीट मिळणार आहे. तसेच 22 रुपये किमतीच्या दुधाच्या 500 मिली पॅकेटमध्ये 50 मिली अतिरिक्त दूध उपलब्ध होणार असून यापुढे 550 मिली दूध पाकिटासाठी 24 रुपये आकारले जाणार आहेत.

काँग्रेस सरकार सत्तेवर आले त्यावेळी राज्यात सरासरी 72 लाख लिटर दूध संकलन होत होते. यादरम्यान दुधाच्या दरात ३ रुपये अतिरिक्त वाढ करून हा निधी थेट शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे हा यामागील उद्देश असून यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जनावरांसाठी मुबलक हिरवा चारा देखील उपलब्ध झाला आहे.

या कारणांमुळे दुधाचे उत्पादन आता जवळपास 1 कोटी लिटर प्रतिदिन झाले आहे, हे वाढलेले उत्पादन हाताळण्यासाठी आणि ते शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे याची खात्री करण्यासाठी केएमएफने हा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.