बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरात ओव्हर ब्रिजच्या उभारणीसह गोकाक फॉल्स येथे केबल कारची व्यवस्था करावी. बेळगाव -हुनगुंद -रायचूर महामार्ग करावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील विविध योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
अनेकदा पाठपुरावा करून देखील बेळगाव मधील काही योजना अद्याप प्रलंबित आहेत. आता पुन्हा एकदा जुन्या मागण्यांसह कांही नव्या योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी केली. बेळगाव -हुनगुंद -रायचूर महामार्गाची मागणी प्रलंबित आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक फॉल्स येथे केबल कारच्या सुविधेची घोषणा करून काही वर्षे लोटली आहेत, मात्र त्यासाठी निधी उपलब्ध केलेला नाही. कित्तूरहून बैलहोंगलच्या संपर्कासाठी रस्त्याची सुधारणा गरजेची आहे. बेळगाव शहरातील ओव्हर ब्रिजचे काम व्हावयाचे आहे. या सर्व विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांच्याकडे सादर केला.
बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पासून गोकाक -यरगट्टी -मुनवळ्ळी मार्गे नरगुंदच्या संपर्कासाठी असणाऱ्या 157 कि.मी. अंतराच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग, तसेच केरळ मधील कलपेठ पासून मानंदवाडी, एच. डी. कोटे -जयपूर मार्गे म्हैसूरच्या संपर्कासाठी असणारा 90 कि.मी. रस्त्याला महामार्ग म्हणून मान्यता देण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी मांडला.
तसेच बेळगाव -हुनगुंद ,रायचूर महामार्ग, बंगळूर -चेन्नई एक्सप्रेस महामार्ग, बेंगळूर शहरातील रिंग रोड, ग्रीनफिल्ड कॉरिडोर विकासाला मंजुरी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कर्नाटकातील रस्त्यांच्या संपर्काचे जाळे सुधारायचे असून एकूण 5225 कि.मी. अंतराच्या 39 रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.