Monday, January 13, 2025

/

बेळगावात पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणारा कोण आहे?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव न्यायालय आवारात आज पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. हि घोषणाबाजी करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून कुप्रसिद्ध गँगस्टर जयेश पुजारी आहे!

जयेश पुजारीवर आजतागायत अनेक गुन्हे दाखल असून २०२३ साली त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. दरम्यान हिंडलगा कारागृहातून जयेश पुजारीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देत फोन कॉल केला आणि तेव्हापासून जयेश पुजारी पुन्हा चर्चेत आला. याशिवाय जयेश पुजारीने कर्नाटकचे एडीजीपी अलोक कुमार यांनाही धमकावल्याचा आरोप आहे.

खटल्यासाठी आणलेल्या आरोपी जयेश पुजारीने न्यायालयाच्या आवारातच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. उपस्थित वकील आणि लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी त्याचा कसाबसा मारहाणीतून जीव वाचवला.

आज बेळगाव न्यायालय आवारात झालेल्या प्रकारानंतर जयेश पुजारी हे प्रकरण चवीने चघळले जात आहे. राजकीय, सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांना जयेश पुजारीचे बेळगाव कनेक्शन काय आहे? जयेश पुजारी कोण आहे? त्याने पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा का दिल्या? असे अनेक प्रश्न पडले आहेत…

जयेश पुजारी (कांता) उर्फ झाकीर आलियास उर्फ पाशा याचा अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. नागपूर पोलिसांनी त्याच्यावर नवीन गुन्हाही दाखल केला आहे. विशेष म्हणजे जयेशला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

कर्नाटकातील कनिष्ठ न्यायालयात त्याच्यावरील आणखी दोन खटल्यांची सुनावणी सुरू आहे. बेळगावच्या हिंडलगा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असून २०२३ साली त्याने गडकरींच्या कार्यालयात तुरुंगातून फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. २०१२ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी) साठी दहशतवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणात तो दोषी ठरला होता. बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे डिसेंबर २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचा सहभाग होता असा आरोप आहे.

जयेशचे वकील नितीश समुद्रे यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपी गरीब कुटुंबातील आहे. पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब असणाऱ्या जयेश पुजारी विरुद्ध कर्नाटकात दोन खटले सुरू आहेत. त्याच्या खटल्याला उपस्थित राहणे हा त्याचा अधिकार आहे.Jayesh pujari

त्यामुळे त्याला बेळगाव कारागृहात राहणे आवश्यक आहे. धंतोली पोलिसांनी हिंडलगा येथील जेएमएफसी न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेऊन नागपुरात आणले होते, असा युक्तिवादही करण्यात आला आहे. त्याला नागपूर जेएमएफसी कोर्टात हजर करून एमसीआरमध्ये ठेवण्यात आले. मात्र २७ मार्च २०२३ रोजी बेळगाव मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांनीही जयेशला परत पाठवण्याचे आवाहन नागपूर पोलिसांना केले होते. हे प्रकरण आता उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे.

दरम्यान आज बेळगावमध्ये झालेल्या प्रकारानंतर जयेश पुजारीसंदर्भात आणखी एक नवी माहिती समोर आली असून त्याने केरळमध्ये जाऊन इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांनी त्याच्या नावासंदर्भातही चौकशी सुरु असल्याचे सांगितले. जयेश पुजारीला झालेल्या मारहाणीनंतर बेळगाव एपीएमसी पोलिसांनी त्याला एपीएमसी पोलीस स्थानकात घेऊन गेले. मात्र यावेळी जयेश पुजारीने आपल्यावर खोट्या आरोपाखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत असा दावा केला.

केंद्र सरकार कटकारस्थान करून आपल्याला अडकवू पाहत आहे आणि यामुळेच आपला अर्ज आणि कागदपत्रे न्यायालयात स्वीकारत नसल्याचेही त्याने सांगितले. आपण पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या कारण आपल्याला पाकिस्तानप्रमाणेच वागणूक मिळत असल्याचेही जयेश पुजारीने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.