बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांचा विरोध डावलून हलगा – मच्छे बायपासचे काम अखेर सुरु झाले. आता या पाठोपाठ रिंगरोडसाठीही हालचाली सुरु झाल्या असून बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी रिंगरोडसाठी येत्या दोन महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन बेळगावच्या विकासाबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर गुरुवारी सायंकाळीचं बेळगाव विमानतळाची पाहणी करून विकास कामांचा आढावा घेतला होता त्यानंतर शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रिंग रोड हालगा मच्छे बायपास आणि बेळगाव रेल्वे लाईन चे प्रलंबित काम याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
आज बेळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना देत दिरंगाईच्या धोरणाबाबत कडक निर्देश दिले आहेत.
गुरुवारी बेळगावमध्ये दाखल झालेले खासदार जगदीश शेट्टर यांनी सर्वप्रथम विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविली.
या बैठकीत त्यांनी रिंगरोडच्या कामकाजाबाबत अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष यावर ताशेरे ओढले. रिंगरोडसाठी ५०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. मात्र अद्याप यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. २०१७ मध्ये सुरु झालेल्या या योजनेसाठी ५०० एकर पैकी केवळ ४० एकर भूसंपादन करण्यात आले आहे.
भूसंपादन पूर्ण होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी निविदा मागविल्या असून या प्रकारावर अधिकाऱ्यांना खासदारांनी फैलावर घेतले. प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण झाली नाही तर त्याचे आरोप सरकारवर लावले जातात त्यामुळे या प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देऊन येत्या २ महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सुचविले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, एस.पी. भीमा शंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.