Thursday, December 19, 2024

/

बेळगाव शेतकरी संघटनेने खा. शेट्टर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि परिसरातील लेंडी नाला आणि बळ्ळारी नाला या नाल्यांची त्वरित साफसफाई करण्याबरोबरच या नाल्यांमुळे क्षतीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी आज बेळगाव शेतकरी संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली.

बेळगाव शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्ष नारायण बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी शहरातील सर्किट हाऊस येथे खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली.

या भेटीप्रसंगी उपरोक्त मागणीचे निवेदन खासदारांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून खासदार शेट्टर यांनी गेल्या वीसएक वर्षापासून लेंडी नाला आणि बळ्ळारी नाला यांच्या सफाईसह विकासाकडे का दुर्लक्ष केले जात आहे? याचा संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल आणि त्यासाठी आपण लवकरच अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊ. याप्रकरणी गांभीर्याने चौकशी करण्याबरोबरच भ्रष्टाचार झाला आहे का? हे तपासले जाईल असे आश्वासन खासदारांनी दिले.

बेळगाव शहर आणि परिसरातील नाले तुंबून त्यांना पूर येत असल्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. पुढे दिलेल्या कारणांमुळे संबंधित शेतकऱ्यांना दरमहा एकरी 1 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.Bgm farmers demand

1) लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याची वेळच्यावेळी साफसफाई केली जात नाही. मात्र त्याचा खर्च दाखवला जातो. 2) साफसफाई अभावी पाण्याचा निचरा न होता नाले तुंबून पाणी पात्राबाहेर पडते. 3) राष्ट्रीय महामार्गाजवळील नाला गाळ केरकचऱ्यामुळे आडला गेला आहे. 4) मुचंडी गावाजवळ रेल्वे मार्गाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या खडकामुळे बळळारी नाल्याचे पाणी तुंबून आसपासच्या शेतात घुसत आहे.

तसेच घाण केरकचरा युक्त तुंबलेल्या या पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे बळ्ळारी व लेंडी नाला तुंबून निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी एकरी सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरेने शेतकऱ्यांना शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत. दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे जर 1000 एकरहून अधिक शेतजमिनीचे नुकसान होत असेल तर ‘शेती हा आपल्या देशाचा कणा आहे’ असे म्हणण्यात काय अर्थ आहे? यासाठी वेळच्यावेळी नाल्यां साफसफाई केली जावी आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी याकरिता आम्ही दरवर्षी सातत्याने पाठपुरावा करत असतो.

मात्र त्यासंदर्भात आजतागायत कोणतीच कार्यवाही झालेले नाही. नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे मागील वर्षी पावसाळ्यात बेळगाव शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

सदर परिस्थिती पुन्हा यावेळी उद्भवू नये यासाठी युद्धपातळीवर बळ्ळारी व लेंडी नाल्याची साफसफाई केली जावी. त्याचप्रमाणे मुचंडी गावाजवळील रेल्वे मार्गाच्या ठिकाणी नाल्याला अडचण ठरणारा खडक हटविण्यात यावा, अशा आशयाचा तपशील बेळगाव शेतकरी संघटनेच्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष नारायण सावंत यांच्यासह मारुती सावंत, अशोक पावशे, युवराज सावंत, पी. आर. जांगळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.