Friday, December 27, 2024

/

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या चिंतनीय

 belgaum

बेळगाव लाईव्ह : उघड्या आभाळाखाली सदोदित काम करत, डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे पिकाची राखण करणाऱ्या शेतकऱ्याला कोणतीच हमी नसते. कधी ओला तर कधी कोरडा, कधी पिकाला मिळणारा कवडीमोल भाव तर कधी निकृष्ट दर्जाचे बी – बियाणे, खतांमुळे शेतकऱ्याला बसणारा फटका, डोक्यावर पिकासाठी घेतलेले कर्ज आणि या सर्व कारणांमुळे कर्ज न फेडता आल्याने स्वीकारलेला आत्महत्येचा मार्ग…

आत्महत्येनंतर कुटुंबाची होणारी परवड… या गोष्टी काळजावर घाव घालणाऱ्या आहेत. गेल्या १५ महिन्यात सुमारे ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कित्येक कुटुंबांचा आधारवड हरपल्याने कुटुंब संकटात सापडली आहेत. अद्याप कित्येक कुटुंब नुकसानभरपाईचा प्रतीक्षेत असून जिल्ह्यातील सात नद्यांना आलेल्या पुरामुळे, दुष्काळामुळे १५ तालुक्यातील ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

२०२३ – २४ सालात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १ एप्रिल २०२४ ते २७ जून या कालावधीत ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या माघारी असणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती त्याहूनही अधिक बिकट असते. मात्र या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत नुकसानभरपाईदाखल देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पुढाकार घेतला जातो.

२०२३ -२४ साली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे नुकसानभरपाईसाठी १०२ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी २० अर्ज रद्दबातल ठरविण्यात आले असून जिल्हाधिकारी, विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समितीने ८२ अर्ज मंजूर केले आहेत. चालू वर्षातील ८ अर्जाची छाननी करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळत नाही. याच कारणामुळे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करत नाहीत. यामुळे राष्ट्रीय बँकाही कर्ज देत नाहीत. परिणामी अपरिहार्यपणे अनेक शेतकऱ्यांना फायनान्स, सोसायटी आणि हातउसणे या स्वरूपात कर्ज मिळत आहे. शेतकरी नेते सिध्दगौडा मोदगी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, कि जेव्हा शेतकरी पीक नुकसान आणि कर्जामुळे आत्महत्या करतात, तेव्हा अधिकारी अस्तित्वात नसलेली कागदपत्रे मागतात यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची परवड होते.

कृषी आणि महसूलसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी निकषांचे योग्य पालन केल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना महिनाभरात नुकसान भरपाई मिळू शकते, असे ते म्हणाले. मात्र अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षानुवर्षे उलटूनही नुकसान भरपाई मिळाली नसून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कुटुंबीयांची भटकंती सुरु असते, असे मत शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.