Saturday, November 16, 2024

/

उच्च-मूल्य मालमत्ता ओळखण्यासाठी बेळगाव मनपा स्थापणार समिती

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटविण्यासाठी बेळगाव महानगर पालिकेने समिती स्थापन करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांत मनपा कार्यालयातून कागदपत्रांच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्यापक भ्रष्टाचार आणि बनावटगिरीचा संशय निर्माण झाल्याने महापालिकेच्या मालमत्तेशी संबंधित मूळ कागदपत्रे नष्ट करण्यासाठी चोरी करण्यात आल्याचा आरोप पुढे येत आहे.

काही नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या मालकीच्या 95 हून अधिक मालमत्ता आहेत ज्या सामाजिक सेवांमध्ये गुंतलेल्या आहेत. शिवाय विविध सरकारी आणि खाजगी संस्थांना भाड्याने किंवा लीजवर देण्यात आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी ७० हून अधिक मालमत्तांचे भाडे करार कालबाह्य झाले असून अद्याप या मालमत्तांवर मनपाने ताबाही मिळविलेला नाही.कित्येक मालमत्तांची थकबाकी अद्याप शिल्लक असून यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी मुद्दा देखील उपस्थित केला होता.

परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर काही नगरसेवकांनी बैठकीत नाराजीही व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. मनपाच्या मालकीच्या मालमत्तेतून 26 कोटी रुपयांची थकबाकी असून 2013 पासून विविध प्रशासक आणि आयुक्तांच्या कार्यकाळात काही अधिकाऱ्यांनी समाजसेवेच्या नावाखाली मालमत्ता मिळवून स्वत:च्या नावावर नोंद केल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.

अलीकडेच गोवावेस येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात सहा महिन्यांच्या कालावधीत २ वेळा चोरीच्या घटना घडल्या असून या प्रकारानंतर बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यानंतर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तेबाबत मनपाकडे स्पष्ट माहिती नसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्यानंतर आता अशा सर्व मालमत्ता शोधण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सर्वेक्षण करून सर्व महामंडळाच्या मालमत्तेचा सर्वंकष अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवल्या जात असल्याची ग्वाही मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.