बेळगाव लाईव्ह : मागील काही दिवसात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे बालविक्री प्रकरणातील बोगस डॉक्टरांचा पर्दापाश करण्यात आला होता.
कित्तूर येथील बोगस डॉक्टर अब्दुल गाफूर लाडखान प्रकरणानंतर आरोग्य विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून या कारवाईंतर्गत आज बेळगावमधील भडकल गल्ली येथील शिवा क्लिनिक आणि गुरुकृपा क्लिनिकवर छापा टाकून तेथील दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी आणि तहसीलदार संजय डुम्मगोळ यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई करण्यात आली असून नागरिकांच्या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर करडी नजर ठेवून आरोग्य विभागाने या दोन रुग्णालयावर छापा मारला असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. यावेळी शिवा क्लिनिकला नोटीस दिल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डीएचओ महेश कोणी म्हणाले की, भडकल गल्ली येथील शिवा क्लिनिकमध्ये औषधे विक्री करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. या क्लिनिकची नोंदणी बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. छापा टाकून तपस करण्यात आला असता, डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यावरून या क्लिनिकवर कारवाई केल्याचे ते म्हणाले.
सदर क्लिनिकसंदर्भात तीन वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यावेळीही कारवाई करण्यात आली होती. मात्र आता दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर सखोल चौकशी करून क्लिनिकवर छापा टाकण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी सांगितले.