बेळगाव लाईव्ह:हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील जलवाहिनीला आज गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरी जलाशयात मुबलक पाणीसाठा नसल्यामुळे जनतेला पाण्याचा जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी शहापूर हट्टीहोळ गल्ली येथील जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सदर गळती इतकी मोठी आहे की पाण्याचा लोट रस्त्यावरून वाहत धो धो गटारीत मिसळत आहे. तरी या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाला आळा घालण्यासाठी पाणी पुरवठा मंडळाने हट्टीहोळ गल्ली येथील जलवाहिनीला लागलेली गळती युद्धपातळीवर दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
सरस्वतीनगर येथील ‘या’ समस्येकडे कोणी लक्ष देईल का?
शहरातील सरस्वतीनगर येथे नवी पाईपलाईन घालण्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले असले तरी त्यामुळे येथील रस्त्यांची मात्र संपूर्ण वाताहत झाल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून आमचे रस्ते केंव्हा पूर्ववत चांगले होणार? असा संतप्त सवाल त्यांच्याकडून केला जात आहे .
सरस्वतीनगर येथे अलीकडे काही दिवसांपासून नवी पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी या ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे आता पाईपलाईन घालण्याचे काम पूर्ण झाले असले तरी खोदकामामुळे येथील रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे. सध्याच्या पावसामुळे तर खोदकामाच्या मातीमुळे सरस्वतीनगर येथील रस्त्यांवर संपूर्णपणे चिखल दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचा वापर करताना येथील रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांना तर चिखल-दलदलीचा त्रास होतच आहे, याखेरीस वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात माती व चिखलाची दलदल निर्माण झाल्यामुळे रस्त्यावर दुचाकी वाहने आणि ऑटो रिक्षा अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सरस्वतीनगर येथील खोदकाम करून दुर्दशा करण्यात आलेले रस्ते पूर्व चांगले करावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.