बेळगाव लाईव्ह :महात्मा फुले भाजी मार्केटमधील सहा गाळ्यांना आणि दोन गोदामांना महापालिकेच्या पथकाने शनिवारी टाळे ठोकले. यावेळी महापालिका अधिकारी, व्यापारी आणि जागेचे दावेदारांचे वकील यांच्यात बाचाबाची झाली.
महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यांबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे. पण काही जणांनी गाळ्यांचा बेकायदा ताबा घेतला आहे. त्यातील व्यापाऱ्यांकडून भाडे वसूल करण्यात येत आहे, इमारतीवर आपला हक्क असल्याचा फलक लिहिला आहे, असा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी केला होता.
महापालिकेचे पथक महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गेले. त्या ठिकाणी सहा गाळ्यांना आणि दोन गोदामांना टाळे ठोकून ताबा घेतला. हा प्रकार होत असताना एका दावेदाराच्या वकिलाने त्या ठिकाणी येऊन या गाळ्यांना न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे, असे सांगितले. काही गाळेधारकांनी महापालिकेच्या या कारवाईला विरोध केला. महापालिकेने लावलेले टाळे काढण्याचा प्रयत्न झाला. पण वकील त्या ठिकाणाहून परत गेल्यानंतर महापालिकेने या आठ गाळ्यांना टाळे ठोकले.
महात्मा फुले मार्केटवर इनामदार कुटुंबीय, इजाज अहमदी, महापालिका आणि वक्फ बोडनि दावा केला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून महापालिकेने अनेकदा लिलाव प्रक्रिया राबवली, तरी त्याला प्रतिसाद मिळालेला नव्हता. पण इमारतीवर खाजगी मालकीचा फलक लागल्याने महापालिकेने हे प्रकरण गांभीयनि घेतले आहे.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी त्यांच्या सूचनेनुसार महसूल अधिकारी संतोष अनीशेट्टर, महसूल निरीक्षक नंदकुमार बांदिवडेकर आदींनी ही कारवाई केली.