बेळगाव लाईव्ह:श्रीलंकेमध्ये येत्या जुलैमध्ये होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड होऊनही प्रवास व इतर खर्च आवाक्या बाहेर असल्याने निराश झालेल्या बेळगावच्या 7 दिव्यांग खेळाडूंच्या मदतीला धावून जात फेसबुक फ्रेंड्स सर्कलने दानशूर व्यक्ती, संघ-संस्था, उद्योजक, पोलीस प्रशासन वगैरेंच्या सहकार्याने आतापर्यंत 1 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचे संकलन करण्याचे प्रशासनीय कार्य केले आहे.
श्रीलंकेमध्ये येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या बेळगावच्या सूरज धामणेकर, महांतेश होंगल, मन्सूर मुल्ला, सुरेश कुंभार, एरना होंडाप्पाण्णा, मनीषा पाटील व भाग्या मलाली या खेळाडूंनी प्रवास खर्च व इतर गोष्टी संदर्भात आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखालील फेसबुक फ्रेंड्स सर्कलने (एफएफसी) मदत निधी संकलनाचा उपक्रम हाती घेतला होता. त्या अनुषंगाने आज शनिवारी उद्योगपती दिलीप सोफा तसेच बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन व पोलीस उपायुक्त स्नेहा पीव्ही मॅडम यांनी दिव्यांग खेळाडूंना शुभेच्छा देत सूरज धामणेकर व महांतेश होंगल यांच्याकडे मदत म्हणून 10,000 रु. सुपूर्द केले. यावेळी एफएफसीचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर उपस्थित होते.
बेळगावच्या उपरोक्त दिव्यांग खेळाडूंनी प्रचंड समर्पण आणि चिकाटी दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित स्पर्धेसाठी झालेली त्यांची निवड त्यांच्या कौशल्य आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. मात्र, आर्थिक मदतीशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहू शकते.
श्रीलंकेतील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा अंदाजे खर्च सुमारे 65,000 रु. इतका आहे. ज्यामध्ये प्रवास, निवास आणि इतर आवश्यक खर्च समाविष्ट आहेत. दुर्दैवाने खूप मेहनत करूनही या खेळाडूंना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. म्हणूनच एफएफसीने व्यक्ती, संस्था आणि समाजाला या पात्र खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे. या खेळाडूंसाठी नियुक्त केलेल्या निधीमध्ये आर्थिक योगदान दिले जाऊ शकते. व्यवसाय आणि संस्था एखाद्या खेळाडूला प्रायोजित करू शकतात किंवा खेळाडूंचा विशिष्ट खर्च पाहू करू शकतात.
इच्छुकांनी आपली मदत पुढील ठिकाणी जमा करावी. बँकेचे नाव : बेळगावी जिला विकासाचेतनर क्रीडा संघ. बँक खाते क्र. : 39389640257, IFSC कोड : SBINΟΟ40419 फोन नं. : 8861470235, पॅन क्रमांक: AALAB0007A.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंतची पातळी गाठण्यासाठी वरील खेळाडूंनी जवळपास दशकभर अथक परिश्रम घेतले आहेत. ते चिकाटी आणि उत्कृष्टतेच्या भावनेला मूर्त रूप देत आहेत. आता सर्वांच्या मदतीने ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करू शकतात.
सदर खेळाडूंसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलने संकलित केलेल्या 85 हजार रुपयांच्या निधीमध्ये वेगा हेल्मेट ने 25 हजार रुपयांची भर घातली असून आता पोलीस आयुक्त आणि उपायुक्त आणि दहा हजार रुपयांची मदत देऊ केली आहे त्यामुळे आतापर्यंत संबंधित खेळाडूंसाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा निधी संकलित झाला असला तरी खेळाडूंचा श्रीलंकेला जाण्या -येण्याचा खर्च पाहता हा निधी कमीच आहे. तेंव्हा व्यक्ती, संस्था आणि समाजाने आपल्यापरीने होईल तितकी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन एफएफसीने केले आहे.