बेळगाव लाईव्ह : अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आरोपी असलेला डॉक्टर अब्दुलगफार लाड खान यांच्याकडून भ्रूण हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बेळगावच्या माळ मारुती पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून पोलीस, आरोग्य विभाग आणि एफएसएल पथकाने रविवारी सकाळी कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावाजवळील बनावट डॉक्टराच्या फार्महाऊसची तपासणी केली असता शेतात तीन गर्भ मृतावस्थेत आढळून आले.
सदर भ्रूण आणून पुरणारा डॉक्टर अब्दुलगफार लाड खानचा सहाय्यक रोहित कुप्पासगौडर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित अनेक वर्षांपासून अब्दुलगफार लाड खानचा सहाय्यक म्हणून काम करत होता. हे प्रकरण कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले डीएचओ डॉ. महेश कोणी, एसी प्रभावती फकीरपूर, बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नाईक आणि सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले एक महिन्याचे अर्भक डॉक्टरसह काहींनी विकण्याचा प्रयत्न केला. कंपाऊंडर व डॉक्टरने ते ६० हजारांना विकले, तर ज्या नर्स महिलेने ते विकत घेतले तिने ते दीड लाखाला बेळगावात आणून तिसऱ्याला विकण्याचा प्रयत्न केला अश्या टोळीचा मागील आठवड्यात पर्दा फाश झाला होता
माळमारुती पोलिसांनी अर्भक विकणाऱ्या नर्सला रंगेहाथ पकडले. तिने दिलेल्या माहितीवरून डॉक्टरसह पाचजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
असे आहे प्रकरण
याबाबत माहिती अशी की या घटनेतील पवित्रा व प्रवीण या प्रेमीयुगुलाला महिन्यापूर्वी मुलगी झाली. पवित्राची प्रसूती कित्तूर येथील डॉ. अब्दुलगफार यांच्या रुग्णालयात झाली. हे बाळ आपल्याला नको असल्याचे पवित्राने सांगितले. त्यामुळे येथील कंपाऊंडर चंदन याने ते विकण्याचा निर्णय घेतला. पूर्वी नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महादेवी ऊर्फ प्रियांका हिला महिन्याचे अर्भक अवघ्या ६० हजारांना कंपाऊंडरने विकले. ही रक्कम कंपाऊंडर व डॉक्टरने प्रत्येकी निम्मी वाटून घेतली.
महादेवीने कंपाऊंडर व डॉक्टरना ६० हजार दिलेले असल्याने आता हे बाळ जादा रकमेला विकण्यासाठी ती बेळगावात आली. याची कुणकुण माळमारुतीचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला. बाळ विकण्यासाठी आलेल्या महादेवीला ताब्यात घेतल्यानंतर याची शेवटची कडी सापडली. त्यामुळे या प्रकरणात पाच जणांना अटक केली त्यानंतर या सर्व प्रकाराचा उलगडा झाला आहे.