बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती काँग्रेस हायकमांडने दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दिल्ली येथील हायकमांडशी उपमुख्यमंत्रीपदाच्या वाटाघाटीसाठी चर्चा करण्यात येणार असून उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखण्याचा प्रयत्न सुरु झाल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे असे कोणत्याही नेत्याने जाहीरपणे सांगितले नसले तरी अनेकजण या पदासाठी इच्छुक असल्याचे सत्य उघड आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जारकीहोळी कुटुंबाचे वर्चस्व या माध्यमातून पुन्हा एकदा प्रस्थापित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून उपमुख्यमंत्री पदासाठी सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत असल्याचेही बोलले जात आहे.
सतीश जारकीहोळी समर्थकांनी पुढील मुख्यमंत्री सतीश जारकीहोळीच असतील असा प्रचार करण्यास सुरुवात केली असून कर्नाटकातील राजकारणाची सध्यस्थिती पाहता सतीश जारकीहोळी यांना प्रथम उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद देखील देण्यात येतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
सतीश जारकीहोळी यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी दिल्ली गाठली असून दिल्लीत वरिष्ठांसमवेत उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते आहे.