बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्याच लोकांनी आमची फसवणूक केल्यामुळे काँग्रेसच्या विजयाचे मताधिक्य कमी झाले. कुडचीचे आमदार महेंद्र तमन्नावर यांनी निवडणुकीत आपल्या लोकांसाठी काम केले.
याकरिता त्यांच्याविरुद्ध आपण हायकमांडकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
चिक्कोडी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, या वेळच्या निवडणुकीत 2 लाख मतांच्या फरकाने आमचा विजय निश्चित होता. मात्र आमच्यातीलच काहींनी विरोधी भूमिका घेतली. आमदार तमन्नावर यांनी जाणीवपूर्वक आम्हाला विरोध केला आहे. आमच्याच लोकांनी आमची फसवणूक केल्यामुळे विजयाचा मत फरक कमी झाला. मतदार संघाच्या विकासाचा विचार करण्याऐवजी अनावश्यक गोंधळ घालण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला.
बाहेरच्या लोकांच इथे काय काम होतं? असा प्रश्न करून काँग्रेस पक्षाची साधना व गॅरंटी योजनांमुळे मतदार संघातील जनतेचा काँग्रेसला पाठिंबा मिळाला आहे. अथणी मतदार संघात मात्र आम्ही पिछाडीवर पडलो असलो तरी त्याची आम्हाला आधीच कल्पना होती.
काँग्रेसचे जुने नेते कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला असला तरी अलीकडे भाजपमधून काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेल्यांकडून संपूर्ण सहकार्य मिळाले नाही, अशी खंत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
तसेच पुढच्या वेळी आम्ही 2 लाख मत फरकाने विजयी होऊ. तरुण वयातील प्रियांका जारकीहोळी हिला विजयी करून उत्कर्षाची संधी देणाऱ्या या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी, अभिवृत्तीसाठी मी सतत कार्यरत राहीन, असेही मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.