बेळगाव लाईव्ह :रहदारी दक्षिण पोलीस स्थानकाकडून क्लब रोड येथील फुटपाथ खुले करण्याबरोबरच रस्त्याकडेची पार्किंग व्यवस्था सुव्यवस्थित करण्यात आल्यामुळे नागरिक व वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.
हॉस्पिटल्स, हॉटेल्स, दुकाने, मॉल वगैरे असल्यामुळे शहरातील क्लब रोड दिवसभर रहदारीने गजबजलेला असतो. या दुपदरी मार्गावरील एका बाजूच्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी चालकांकडून सातत्याने बेशिस्त पार्किंग केले जात होते. चक्क या रस्त्याच्या फुटपाथवर वाहने पार्क केली जात होती.
त्याचप्रमाणे या ठिकाणी पार्किंग लॉट असला तरी चारचाकी वाहन चालक रस्त्यावरच आपली वाहने पार करत होते. बेशिस्त पार्किंगमुळे या रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होत होता. याची गांभीर्याने दखल घेत रहदारी दक्षिण विभाग पोलिसांनी फुटपाथवर वाहने पार्क करण्यास बंदी घालून सदर रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगला शिस्त लावली आहे.
आता दुचाकी वाहने नीट रस्त्याशेजारी रांगेत आणि चार चाकी वाहने पार्किंग लॉटच्या ठिकाणी पार्क केली जात असल्यामुळे क्लब रोड रस्ता प्रशस्त असा मोकळा श्वास घेताना दिसत आहे. यामुळे परिसरातील स्थानिक रहिवासी, वाहन चालक अशा सर्वांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रहदारी दक्षिण विभाग पोलीस ठाण्याच्या उपरोक्त कार्यवाहीची सोशल मीडियावरही प्रशंसा होत आहे. रहदारी पोलिसांकडून उत्तम काम आशा आहे भविष्यातही ते कायम राहील.
मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, गणपत गल्ली या बाजारपेठेच्या ठिकाणी याची अधिक गरज आहे. खडेबाजार, दरबार गल्लीचे देखील फोटो घाला. कृपया गणपत गल्लीत हे करावे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.