बेळगाव लाईव्ह:दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बेळगाव शाखेच्या यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उद्या रविवार दि. 9 आणि सोमवार दि. 10 जून रोजी केएलई कन्व्हेंशन सेंटर बेळगाव येथे चार्टर्ड अकाऊंटंट्सची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयसीएआय बेळगावचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंदडा यांनी दिली.
टिळकवाडी येथील स्वरूप प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संजय घोडावत, डॉ. विजय संकेश्वर आणि डॉ प्रभाकर कोरे उपस्थित राहणार आहेत. याखेरीज आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए रणजीत कुमार अगरवाल, उपाध्यक्ष सीए चरणज्योतसिंग नंदा, नियोजित अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, उपाध्यक्ष सीए दयानिवास शर्मा तसेच सीए कोठाश्रीनिवास व एसआयआरसीच्या चेअरपर्सन सीए गीता ए. बी. हजर राहणार आहेत.
सीए क्षेत्रामध्ये आलेले नवनवीन कायदे झालेले बदल यांची सदस्यांना तसेच या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावी हा या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे, असे सीए डॉ मुंडडा यांनी पुढे सांगितले.
उद्या रविवारी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर सकाळी 10:30 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनिकेत तलाठी, मनू अगरवाल, विशाल दोशी व मडिवाळप्पा तिगडेमी हे चार्टर्ड अकाऊंटंट्स वेगवेगळ्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 10 जून रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत सीए आनंद जांगिड यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर 11:15 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुखविंदर सिंग, अनुपमा श्रीकांत व अमिष ठक्कर हे चार्टर्ड अकाऊंटंट्स आपले विचार मांडणार आहेत. परिषदेत बेळगावसह विजापूर, बागलकोट, हैदराबाद, कराड वगैरे ठिकाणचे सीए व विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये अवयव दाना बद्दल जागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयसीएआय बेळगाव शाखेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 विभिन्न सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहितीही सीए डॉ. राजेंद्र मुंदडा यांनी दिली. पत्रकार परिषदेस बेळगाव शाखेचे सचिव संजीव देशपांडे, यासीन देवलापूर वगैरे चार्टर्ड अकाऊंटंट्स उपस्थित होते.