बेळगाव लाईव्ह :कॅण्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी भरती घोटाळाप्रकरणी सीबीआय चौकशी सुरुच आहे.सीबीआयच्या पथकाने १४ मे रोजी कॅण्टोन्मेंट बोर्डात चौकशी करुन काही फाईली बंगळूरला नेल्या होत्या. नुकताच पथकाने अचानक १८ कर्मचाऱ्यांच्या घरी भेट देऊन चौकशीला प्रारंभ केला. ही चौकशी २१ जूनपर्यंत चालणार असल्याचे समजते.
नोव्हेंबरमध्ये सीबीआयची चौकशी सुरु असतानाच कॅण्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन सीईओ के. आनंद यांनी जीवन संपविले होते.
यामुळे काही दिवस चौकशी थांबविण्यात आली होती. मात्र, १४ मे रोजी बंगळूरमधील सीबीआय पथकाने बोर्डाच्या कार्यालयातून महत्वाच्या फाईल्स ताब्यात घेतल्या होत्या.
आता गेल्या चार दिवसांपासून सीबीआयचे नवे पथक बेळगावात ठाण मांडून आहे. या पथकाकडून कॅण्टोन्मेंट क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जात आहे.
यामुळे, कर्मचारी भरतीतील भ्रष्टाचार प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले असून त्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले आहेत.