बेळगाव लाईव्ह:बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील 29 कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी गेल्या 5 जूनपासून शहरात मुक्काम ठोकून असलेल्या सीबीआय पथकाने यापूर्वीच्या चौकशी आधारे पुन्हा भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भरतीतील आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन सीईओ के. आनंद यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये आत्महत्या केल्यानंतर भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी कांही काळ थांबली होती.
याच कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांनीही सीबीआय अधिकाऱ्यांना चौकशी थांबविण्याची विनंती केली होती.
तथापि गेल्या 14 मे रोजी सीबीआयच्या पथकाने अचानक कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला भेट देऊन यापूर्वी झालेल्या तपासाची कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच त्या आधारे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
परिणामी सहा महिन्यापूर्वी सीबीआय पथकाला आपण काय माहिती दिली होती? कुणाची नावे घेतली होती? हे आठवण्यासाठी चौकशीला सामोरे जाणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना बुद्धीला ताण द्यावा लागत आहे.
आतापर्यंत 18 कुटुंबांची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरित 11 कुटुंबांची बाकी आहे. सीबीआय पथकात तिघा अधिकाऱ्यांचा समावेश असून हे पथक कोणतीही पूर्वकल्पना न देता चौकशीसाठी येत असल्यामुळे भरती झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे.