बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल पर्यंतच्या रस्त्याशेजारी कचरा टाकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याशेजारी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करण्याच्या प्रकाराला आता चाप बसणार आहे.
सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल पर्यंतच्या रस्त्यावर जवळपास सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या बाबतीत म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच सतर्क असते.
मात्र अलीकडे कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये विशेष करून सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल पर्यंतच्या रस्त्याशेजारी बेळगाव महापालिकेच्या व्याप्तीतील कचरा उघड्यावर टाकला जात होता. त्यामुळे सदर रस्त्यावर अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण पसरत होते.
या रस्त्यावर पुरेशा पथदिपांची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता निर्मनुष्य असल्याची संधी साधून महापालिका हद्दीतील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत होते.
सदर प्रकाराची बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर कचरा टाकून कोण अस्वच्छता निर्माण करत आहे? याचा छडा लागणार आहे. कारण कचरा टाकणाऱ्यांची छबी कॅमेरामध्ये कैद होणार आहे. कचरा टाकणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार असून हा दंड 50 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने नुकतीच आपल्या हद्दीमध्ये अवजड वाहनांना बंदी केली आहे. त्या मागोमाग आता बोर्डाने उपरोक्त रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याद्वारे कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या विरुद्ध मोहिम उघडली आहे.