बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राप्रमाणे सीमाभागातील दिंड्यांना देखील आर्थिक मदत देण्यात यावी विशेषत : बेळगाव, खानापूर, निप्पाणी व परिसरातील दिंड्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीस्तव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांना पात्र लिहिण्यात आले आहे.
दुसरीकडे सीमा भागातील दिंड्या देखील मोठ्या संख्येने दरवर्षी आषाढी वारीला जात असतात त्या दिंड्यांना देखील महाराष्ट्राप्रमाणे मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगावसह सीमाभागातून हजारो वारकरी दरवर्षी आषाढी-कार्तिकीला पंढरपूरला पाई दिंडीतून दर्शनासाठी जात असतात. यामधून बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यासह सीमाभागातील शेकडो दिंड्या देखील पायी चालत आषाढी वारी करत असतात.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच महाराष्ट्रातील दिंड्यांना वीस हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. अशीच मदत सीमाभागातील 865 खेडेगावातील दिंड्यांना देखील लागू करावी अशी मागणी, समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी पत्र लिहून सदर मागणी केली असून या मागणीच्या निवेदनावर बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज यांनीही सही केली आहे.