बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कर्नाटक राज्यातील पाच शहरांना ‘सेफ सिटी’ योजना मंजूर करण्याची विनंती केली. निर्भया निधीतून बेळगावसह हुबळी-धारवाड, बेंगळूर, मंगळूर आणि कलबुर्गी या शहरांत प्रत्येकी २०० कोटी रुपये खर्चुन सेफ सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटकेचे अधिकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉडी वॉर्न कॅमेरा सक्तीचा आहे. त्यामुळे राज्यातं अद्याप १७५ कोटी रुपये खर्चुन ५८,५४६ बॉडी वॉर्न कॅमेरा खरेदी करणे आवश्यक आहे. याकरिता १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंतही सिद्धरामय्या यांनी अमित शहा यांना केली आहे.
पोलीस स्थानके बांधण्यासाठी ३०० कोटी रु. हवे
यंदा भाडोत्री इमारतीत असणारे /जीर्ण झालेल्या १०० पोलीस स्थानकांना नव्या इमारती बांधून देण्याकरिता प्रत्येकी ३ कोटी रुपये खर्च येणार डॉ. आहे. याकरिता ३०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर करावेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याकरिता केंद्राकडून आवश्यक साहाय्य करण्यासंबंधीच्या विविध प्रस्तावांना मंजुरी द्यावी.
भारत सरकार ८० कोटी रु. खर्चुन इंडिया रिझर्व बटालियन स्थापनेला मंजुरी मिळाली आहे. बळळारी आणि कारवार येथे दोन अतिरिक्त बटालियन स्थापनेला मंजुरी द्यावी, अशी विनंतीही सिद्धरामय्या यांनी केली आहे.
पोलीस कॅन्टीन सुविधेच्या धर्तीवर अग्नीशमन आणि आपत्कालिन सेवा खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील कॅन्टीन स्थापन करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू उपस्थित होते.