बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये लवकरात लवकर एक अवजड (बृहत) औद्योगिक युनिट स्थापन करण्याची विनंती भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय अवजड (बृहत) उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे केली आहे.
बेंगलोर येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच आमदार बेनके यांनी उपरोक्त मागणीची निवेदन त्यांना सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करताना ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले की, बेळगाव हे भारतातील औद्योगिक विकासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
त्याच्या अंगभूत क्षमतांसह आणि उद्योजक नागरिकांसह बेळगाव हे गुंतवणुकीच्या संधीसाठी एक आदर्श पर्याय आहे. बेळगावमध्ये अनेक उद्योग आहेत. प्रामुख्याने हायड्रोलिक आणि फाउंड्री उद्योग हे सर्वात महत्त्वाचे आहेत. बेळगाव हे अन्नधान्य, ऊस, कापूस, तंबाखू, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थांचे व्यापारी केंद्र आहे. मुख्यत्वे करून मौल्यवान धातू, खनिजे, सिलिका या ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळतात.
त्यामुळे सिमेंट, पावरलूम इत्यादी कारखान्यांसाठी देखील हे योग्य क्षेत्र आहे. शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावमध्ये नामांकित विद्यापीठे, अभियांत्रिकी विद्यापीठे, तांत्रिक संस्था, पदवी व पदवीधर महाविद्यालय आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कोणतीही समस्या नाही. याखेरीज शहराच्या आजूबाजूला सरकारी जमीन असून जी रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आहे. बेळगावात सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत.
मुख्यत्वे करून बेळगावातील तरुण कलागुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी माहिती देऊन त्यामुळे बेळगावमध्ये अवजड (बृहत) औद्योगिक युनिट स्थापन करण्यावर भर दिला जावा.
बेळगावमध्ये येऊन जागेची पाहणी करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केली. त्यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी आश्वासन दिले.