बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी खात्याने वॉट्सअप हेल्पलाईन जारी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खते, शेतकऱ्यांची विविध मार्गाने होणारी फसवणूक टाळता येणार असून या पद्धतीचा अवलंब बेळगावमध्येही करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात.
खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. या नव्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना आता थेट तक्रार करता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता कर्नाटकातही अशाच पद्धतीचा निर्णय घेण्यात यावा, राज्यातील बोगस बियाणे आणि खते यावर आला घालण्यात यावा,
बोगस बियाणे आणि खतांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध नवा कायदा आणण्यात यावा, सरकारने याबाबत कठोर पावले उचलावीत तसेच महाराष्ट्र राज्यांप्रमाणेच बेळगावमध्येही हि सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.