बेळगाव लाईव्ह : अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येत असून या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यात १००० आंगणवाड्यांच्या इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. आज बेळगावमधील कुमारगंधर्व कलामंदिर येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आज बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन, गणवेशाच्या साड्या आणि मोजमापाचे किट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. बेळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या ५६५६ आंगणवाड्यांमधील ४,५८,३८१ लाभार्थ्यांना आज ५६५६ स्मार्ट फोनसह गणेवशाच्या साड्या तसेच आंगणवाड्यांमधून गर्भवती आणि मुलांचे वजन मोजण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग किटचे वितरण करण्यात आले.
आजवर दुर्लक्षित असलेल्या या विभागाच्या माध्यमातून आंगणवाड्यांचा विकास करण्याचे ठरविण्यात आले असून राज्यभरात तब्बल १००० अंगणवाडी इमारती उभारण्यासासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यात २०० इमारतींपैकी १६० इमारती उभारण्यास परवानगी मिळाली असून यासाठी एकूण २० कोटी अनुदानांपैकी २ कोटींचे प्राथमिक टप्प्यात अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलताना महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, तंत्रज्ञानाने आज बरीच प्रगती केली आहे. याच तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपले कौशल्य प्रत्येकाने वाढविले पाहिजे. १९७५ साली दिवंगत इंदिरा गांधी यांनी आंगणवाड्यांची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात केली.
आज आंगणवाड्यांमधून कार्यरत असणाऱ्या सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.