बेळगाव लाईव्ह : भविष्यातील भारताचे नागरिक म्हणून आपली एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मतदान करणे, यासाठी लोकशाहीचे महत्त्व पटवून देणे हा उद्देश ठेवून विद्यार्थिनींच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवून निवडणूक कशी असते याचे प्रात्यक्षिक बालिका आदर्श शाळेतील विद्यार्थिनींना दाखविण्यात आले.
टिळकवाडी येथील टी.एफ.ई. सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2024- 25 ची शालेय निवडणूक पार पडली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी उमेदवार म्हणून होत्या. शालेय पंतप्रधान, सांस्कृतिक मंत्री, क्रीडामंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री आणि सहल मंत्री अशा विविध पदांवर उमेदवारांची निवडणूक घेण्यात आली.
या वेळेला इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला आणि इयत्ता सहावी आणि सातवी अशा दोन्ही वर्गातील फक्त मंत्र्यांना निवडणूक हक्क बजावण्याची परवानगी देण्यात आली होती.
यादरम्यान मतदान कक्ष, मतदान अधिकारी, मतपेटी आदी व्यवस्था करण्यात आली होती. शाळेतील शिक्षक वर्गाने मतदान अधिकारी म्हणून सेवा बजावली. मतदान अधिकारी म्हणून कीर्ती चिंचणीकर, सुजाता देसाई, कविता चौगुले, यशस्वी किंकर, निवेदिता कणबर्गी, वैशाली मिठारे आणि सोनाली लोहार यांनी जबाबदारी पार पाडली,
तर रूट ऑफिसर म्हणून उषा कुंदर यांनी काम पाहिले. त्याचबरोबर निवडणूक अधिकारी म्हणून विश्वास गावडे, विजय पार्लेकर आणि नेत्रा कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. या सर्वांना उमेश बेळगुंदकर, अश्विन कुमार पाटील, आर. पी. पाटील आणि मंजुनाथ गोलीहळ्ळी यांचे सहकार्य लाभले.
मुख्याध्यापक आणि संचालक मंडळाच्या प्रेरणेतून हि प्रक्रिया संपन्न झाली.