बेळगाव लाईव्ह: गेल्या पाच दिवसापासून तापाने आजारी पडलेल्या युवकाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
प्रसाद राजू मुचंडी वय 28 रा. लक्ष्मी गल्ली हिंडलगा असे मयत झालेल्या या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
प्रसाद हा मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह(M.R.) म्हणून काम करत होता.शुक्रवारी मध्यरात्री खाजगी इस्पितळात उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.त्याच्या पश्चात वडील पत्नी आणि एक एक महिन्याचा लहान मुलगा असा परिवार आहे. हिंडलगा स्मशान भूमीत सोमवारी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन केले जाणार आहे.
मागील पाच दिवसांपूर्वी गोजगा बेळगाव येथील एका युवकाचा डेंग्यूने बळी घेतला होता त्यानंतर एका आठवड्यातील बेळगाव मधील हा डेंग्यूचा दुसरा बळी आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की प्रसाद हा गेल्या सोमवार पासून तापाने आजारी होता उपचारासाठी त्याला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्री इस्पितळात त्याचा मृत्यू झाला आहे. तो हिंडलगा येथे वडील आणि आजी सोबत तर स्वतः समर्थ नगर येथे राहत होता. बायको माहेरी असल्याने त्याने सुरुवातीला तापा कडे दुर्लक्ष केल्याने आजार वाढला त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
केवळ एक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या त्या युवकावर अवलंबून केवळ एक महिन्याचा लहान मुलगा आणि पत्नी असलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर परिसरात सध्या व्हायरल इन्फेक्शन सुरू असून ताप आला की लागलीच डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि तपासणी करून घेण्याची गरज आहे अशावेळी आजारी पडलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची गरज आहे त्यामुळे आरोग्य खात्याने देखील ताप आलेल्या रुग्णांना तात्काळ उपचार करून घ्यावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.