बेळगाव लाईव्ह : कालपासून ताजमहालमध्ये सीपीआर देऊन एका चिमुरडीचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील मुलगी ही बेळगावमधील असून ती आपल्या आई-वडिलांसोबत ताजमहालला भेट देण्यासाठी गेली होती. आयजा असे या मुलीचे नाव असून काही काल ताजमहलच्या परिसरात आईपासून दूर झाली आणि जोरजोरात रडू लागली. अशातच वातावरणातील उष्म्यामुळे तिला श्वास घेता आला नसल्याने तिची प्रकृती खालावली आणि अति रडण्यामुळे ती बेशुद्ध झाली. दरम्यान याठिकाणी डॉ. रिंकू बघेल नामक डॉक्टर उपलब्ध होते. त्यांनी सीपीआरद्वारे सदर चिमुरडीला वाचवले असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
डॉ. रिंकू बघेल यांनी दिलेल्या सीपीआरमुळे त्या चिमुरडीचा प्रकृती सुधारली. सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ताजमहालमध्ये आयजाच्या शरीराच्या हालचाली थांबल्या होत्या. दवाखान्यात आल्यावर चिमुरडीला सीपीआर देण्यात आला, त्यानंतर तिच्या शरीराची हालचाल सुरू झाली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दिल्लीतील डॉक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या चिमुरडीचा प्राण वाचले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जास्त रडल्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. योग्य वेळी प्राथमिक उपचार केले नाहीत तर मृत्यू देखील संभवतो. अशा परिस्थितीत डॉ. रिंकू बघेल यांनी दाखविलेल्या तत्परतेने देशभरात कौतुक होत आहे.