बेळगाव लाईव्ह : देशसेवेची स्वप्न घेऊन २२ आठवड्यांचे पूर्ण केलेले प्रशिक्षण, नवनव्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास, बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार व उत्साही वातावरणात बेळगावमधील सांबरा प्रशिक्षण केंद्रातील वायुसेना अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला.
शनिवारी सकाळच्या रम्य वातावरणात अग्निवीर प्रशिक्षणार्थींनी दिमाखदार पथसंचलन करत सर्वांची वाहवा मिळविली. सांबरा प्रशिक्षण केंद्रावरील मैदानावर बँडच्या तालावर आगमन केलेल्या अग्निवीर प्रशिक्षणार्थींच्या पथसंचलनाने अंगावर शहारे आले. ‘हर काम देश के नाम’ या घोषवाक्यांतर्गत बेळगावमधील सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी देशसेवेची शपथ घेत देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे वचन घेतले.
एअर कमांडिंग ऑफिसर एअरवाईस मार्शल आर. रविशंकर यांनी दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भविष्यात आपल्यासमोर अनेक आव्हाने, संकटे उभी राहतील. अशावेळी साहसाने प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची ताकद आणि धाडस आपल्यात असणे गरजेचे आहे. देशसेवेत दाखल होण्यापूर्वी 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण तुम्ही घेतले आहे. तुमचे आई-वडील पालक, नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या संबंधित कामाच्या वातावरणात त्यांच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तुम्ही परिश्रम घेतले आहेत. देशसेवा करताना समर्पण आणि निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन एअर व्हाईस मार्शल आर. रविशंकर यांनी अग्निवीरांना केले. प्रशिक्षण केंद्रातून मिळालेल्या प्रशिक्षणातील अनुभवाचा भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे सांगत प्रशिक्षणार्थींना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या २६१४ प्रशिक्षणार्थींची तुकडी पुढील वाटचालीसाठी रवाना झाली. युवकांबरोबर हवाई दलात ६० युवतींनी देखील प्रशिक्षण घेतले आहे. अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींची तिसरी तुकडी सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडत आहे. या दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून सैनिकांनी चित्त थरारक कसरती करून दाखवल्या.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायुसेनेच्या विवेक सिंग रावत यांना बेस्ट इन अकॅडमिक्स, नितीश यांना बेस्ट इन ग्राउंड सर्व्हिस ट्रेनिंगसाठी तसेच विवेक रावत यांना बेस्ट आलराउंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अग्नीवीर वायुसैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.