बेळगाव लाईव्ह :उचगाव येथील श्री मळेकरणी यात्रे मागोमाग आता दरवर्षी जुलैमध्ये होणाऱ्या शहरातील वडगावच्या श्री मंगाई यात्रेतील पशुबळीवर देखील कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. फक्त यात्रा काळातच नव्हे तर इतर वेळी देखील संबंधित परिसरात उघड्यावर पशुबळी दिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच जारी केलेल्या श्री मंगाई यात्रेतील प्राणी हत्या बंदीच्या आदेशामध्ये उपरोक्त इशारा नमूद करण्यात आला आहे. श्री मंगाई यात्रा काळात मंदिर परिसरात कोठेही मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्यांचा उघड्यावर बळी देण्याची प्रथा आहे.
परंतु ही प्रथा चुकीची आहे. कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल सॅक्रिफाइस ॲक्ट तसेच सुधारित कायद्यानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तसेच यात्रा व धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी, रस्त्यावर, मंदिर परिसरात, प्रार्थनास्थळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्राण्यांचा बळी देणे हा गुन्हा आहे.
त्यामुळे वडगाव मंगाई यात्रा काळात पशुबळी देणे चुकीचे आहे. तेंव्हा या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती वजा मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्ष महापिठाचे मुख्य संचालक श्री दयानंद स्वामी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्या अनुषंगाने श्री मंगाई यात्रेतील पशुबळीवर बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
दरवर्षी जुलै महिन्यामध्ये वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा होते. यंदा देखील येत्या 30 जुलै रोजी सदर यात्रा होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 21 जून रोजी जारी केलेल्या आदेशात 27 ते 30 जून या काळात पशू बळी बंदी राहील असे नमूद केले आहे.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आम्हाला जी तारीख समजली त्यानुसार आदेश बजावला आहे. आता जेंव्हा यात्रा असेल तेंव्हा पुन्हा आदेश जारी केला जाईल. वडगावच्या श्री मंगाई यात्रा काळात तसेच इतर वेळीही सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर पशुबळी देणे चुकीचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्राणी हत्या केली जाऊ नये, असा आदेश काढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.