बेळगाव लाईव्ह :इस्पितळात वार्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला साफसफाईचे काम लावण्याच्या हॉस्पिटलच्या हलकर्जीपणामुळे चौथ्या मजल्यावरून पडून एक इसम मृत्युमुखी पडल्याची घटना आज गुरूवारी सकाळी घडली.
मृत्युमुखी पडलेल्या त्या दुर्दैवी इसमाचे नांव सुरज शंकर देवगेकर (वय 54) असे आहे. गंभीर जखमी अवस्थेतील सुरज याच्यावर विजया हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याच हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉयचे काम करणाऱ्या सूरजला इमारत साफसफाईचे काम देण्यात आले होते.
सदर कामाचा अनुभव नसलेला सुरज चौथ्या मजल्यावर साफसफाईचे काम करतेवेळी तोल जावून इमारतीवरून खाली पडला. या घटनेत त्याचे दोन्ही हात व एक पाय फ्रॅक्चर होण्याबरोबरच डोक्यालाही दुखापत झाली होती. तसेच छातीच्या बरबड्याचे तीन ठिकाणी फॅक्चर झाल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत त्याच ठिकाणी उपचार सुरू होते.
मात्र उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सुरज देवगेकर हा गेल्या कांही वर्षापासून विजया हॉस्पिटल येथे वार्ड बॉय म्हणून काम करत होता.
त्याच्या अपघाती मृत्यूचा पंचनामा करून जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.