बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) अंतिम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे निकाल त्यांच्या परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 3 तासांनंतर जाहीर करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रभावी कामगिरीची घोषणा कुलगुरू एस. विद्याशंकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
बीई, बीटेक, बीआर्क आणि बीप्लॅन अभ्यासक्रमांचे निकाल त्वरीत जाहीर केल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी खूप फायदा होणार आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांनी 3 जूनपासून त्यांच्या सर्व सेमिस्टर परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत आणि त्यांच्या पदवी आवश्यकता पूर्ण केल्या आहेत, ते त्यांच्या तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्रांसाठी (पीडीसी) ऑनलाइन अर्ज करू शकतात.
व्हीटीयू-संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम सेमिस्टरच्या अर्थात सत्राच्या परीक्षा 30 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपल्या.
त्याच दिवशी रात्री 8:30 पर्यंत निकाल विद्यापीठाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध होता. या पद्धतीने निकाल तात्काळ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करण्यात आले होते.