बेळगाव लाईव्ह : श्री क्षेत्र रेणुकादेवी (यल्लम्मा) देवस्थानाच्या दर्शनाच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीसा बदल करण्यात आला आहे. मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस श्री यल्लम्मा देवस्थानाचे दर्शनासाठी मुख्य दिवस आहेत.
तथापि उद्या मंगळवार दि. ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून देवस्थानात गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी एसपीबी महेश यांनी परिपत्रक प्रसिद्धीस दिले असून सदर निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अशावेळी यल्लम्मा डोंगरावर गर्दी हाताळण्यासाठी पोलीस बळ अपुरे राहील, तसेच निवडणुकीच्या कामात अनेक शासकीय कर्मचारी व्यस्त असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे देखील कठीण होईल.
यासाठी नागरिकांनी उद्या यल्लम्मा देवस्थानात गर्दी करू नये, मतदान प्रक्रिया चोखपणे पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी यल्लम्मा देवस्थानात श्री रेणुकादेवी दर्शन तसेच पूजा व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली असून सर्व धार्मिक विधी मंदिरापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत.