बेळगाव लाईव्ह: टोल नाक्या मधून आपल्या वाहनाची टोल माफी करून घेणे खानापूर भाजपमधील काहीना अंगलट आली आहे. फसवणूक करून महामार्ग प्राधिकरणाचा महसूल बडवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केवळ भाजपचे पदाधिकारीच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एम.डी.वर देखील चुकीच्या पद्धतीने टोल माफी देण्याचा आरोप ठेवत खानापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी बेळगाव खानापूर रोडवर गणेबैल येथे तब्बल दोन तास झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्या यानंतर खानापूर भाजप मधील टोल माफी मिळवलेले ते पदाधिकारी आणि एन एच ए आय(राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) बॅक फूट वर गेले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव खानापूर रस्ता रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास केलेली दिरंगाई, टोलनाक्यापासून 5 किलोमीटर अंतरावरील लोकांना टोल माफी मिळावी यासाठी आक्रमक झालेल्या स्थानिक शेतकरी नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी खानापूर बेळगाव रोडवरील गणेबैल टोलनाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1: 30 च्या दरम्यान तब्बल दोन तास हे आंदोलन झाल्याने दोन नाकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचा लांब रांका लागल्या होत्या. शेकडो आंदोलक टोलनाक्या समोर घोषणाबाजी करत होते विरोध दर्शवत होते .घटनास्थळी खानापूर पोलीसानी धाव घेऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आंदोलकांनी टोल नाक्यावर असलेल्या खोक्यात टोल माफी असलेल्या गाड्यांच्या नावांच्या सूचीचे फोटो घेत गाडी क्रमांक आणि नावा तपासले असता त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि साखर कारखान्याच्या 43 वाहनांच्या नंबर सापडले आहेत.
मात्र टोल नाक्यावर टोल माफी मिळालेल्या लिस्टमध्ये आमदार खासदारां व्यतिरिक्त लैला शुगर फॅक्टरी आणि काही भाजप पदाधिकाऱ्यांची देखील गाड्यांचे क्रमांक मिळाले त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सरकारी महसूल बुडवून फसवणूक केल्याचा गुन्हा त्या भाजप कार्यकर्त्यांना दाखल करण्याची मागणी केली होती.
भाजप नेत्यांच्या 43 गाड्यांना कोणत्या कायद्या अंतर्गत टोल माफी मिळाली असा सवाल करत नियमबाह्य पद्धतीनें टोल माफी दिलेल्या वर कारवाई करा अशीही मागणी करण्यात आली. आगामी 10 जून पर्यंत यावर तोडगा काढा अन्यथा जेल भरो आंदोलन छेडण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलन स्थळी खानापूर पोलीस आणि टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी मिळून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून देण्यात आले, सर्व सरकारी अधिकारी 4 जूनच्या मतमोजणी प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे 5 जून नंतर तोडगा काढू असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी अॅड. ईश्वर घाडी , सुरेश जाधव, यशवंत बिर्जे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, रमेश पाटील, तसेच स्थानिक शेतकरी, जनता, गाड्यांचे मालक कार्यकर्ते उपस्थित होते.