बेळगाव लाईव्ह : १८ वर्षानंतर भरविण्यात आलेल्या बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील सांबरा या गावची श्री महालक्ष्मी यात्रा सुरु आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यक्रम पार पडत असून शुक्रवारपासून यात्रेला येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे यात्रेचे मुख्य दिवस असून यात्रेला भाविकांची अलोट गर्दी होत आहे.
शनिवारी सकाळपासूनच सांबऱ्याला जाणारे सर्व रस्ते गर्दीने खचाखच भरल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान रहदारी विभागाने यावर तोडगा काढत वाहतूक मार्गात बदल केला आहे.
१) सांबरा विमानतळ आणि बागलकोटकडे जाणाऱ्या नागरिकांनी कणबर्गी-खणगाव क्रॉस-सुळेभावी, मारिहाळ मार्गे पुढे जावे.
३) सांबरा – बागलकोट मार्गे बेळगाव शहरात प्रवेश घेणाऱ्या नागरिकांनी सांबरा विमानतळाहून मारिहाळ, सुळेभावी, खणगाव, कणबर्गी मार्गे शहराच्या दिशेने पुढे जावे.
रविवार दि. १९ मे ते मंगळवार दि. २१ मे पर्यंत वाहतूक वरील मार्गावरूनच सुरु राहील, यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बाची – रायचूर आंतरराज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने लांब पल्ल्याचे प्रवासी व विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चार दिवस रथोत्सव पार पडल्यानंतर शुक्रवारी देवी गदगेवर विराजमान झाली आहे.
यानंतर सांबरा गावात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या गर्दीत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून यात्रास्थळी दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
बेळगाव विमानतळावर प्रवासी वेळेत पोहोचवण्यासाठी ट्राफिक पोलिसांना रविवारचा दिवस कसरतीचा असणार आहे. केवळ रहदारी मार्गात बदल करून चालणार नसून मोठ्या प्रमाणात ट्राफिक पोलीस बेळगाव ते सांबरा या रस्त्यावर तैनात करावे लागणार आहेत. त्यामुळे रहदारीत बदल केलेल्या पोलिसांनी याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान बेळगाव विमानतळावरील प्रवाशांना विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.