बेळगाव लाईव्ह : एकीकडे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आश्वासने, सीमावासीयांसाठी विविध योजना जाहीर करून सीमाप्रश्नाशी बांधिलकी दर्शविणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
मात्र त्यांच्या बेळगाव दौऱ्यात बदल झाला असून गुरुवार दि. २ मे रोजी दुपारी ३.३० वाजता कॅनरा लोकसभा मतदार संघातील खानापूर मधील शिवाजीनगर येथे त्यांचे आगमन होणार आहे. येथील मलप्रभा स्टेडियमवर निवडणूक प्रचार सभा पार पडणार आहे.
त्यानंतर ४ मे रोजी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बाळेकुंद्री खुर्द येथे आयोजिण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत ते सहभागी होणार आहे, अशी माहिती बेळगाव ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
एकीकडे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारची बाजू भक्कम करणारे, सीमावासीयांना आश्वासने देऊन सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेत केंद्राकडे सीमावासियांच्या बाजू मांडणारे पक्षाच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल होत आहेत, याबद्दल सीमावासीयातून नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दुटप्पी धोरणाचा सीमावासीयातून निषेध व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार न करून केंद्राचा विरोध झुगारण्याची हिंमत एकनाथ शिंदे दाखवतील का? याबाबत सीमा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.