बेळगाव लाईव्ह : मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहेत.
तो इंजिनियर आहे तो बिल्डर डेव्हलपर आणि उद्योजक आहे तो ग्रामीण भागातला असला तरी शहरात वास्तव्यास आहे असे असताना आपण जन्मलेल्या गाव परिसरात होत असलेली पाणीटंचाई पाहून गेल्या काही महिन्यापासून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपत आहे.
राज्यात कित्येक ठिकाणी भीषण पाणीटंचाई उद्भवली असून विविध ठिकाणी विविध स्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र बेळगावमधील ग्रामीण भागातील जनता आजही पाणीटंचाईमुळे हैराण झाली असून या पाणीटंचाईवर तोडगा काढत समाजसेवक गोविंद टक्केकर यांनी साडेतीन महिने निरंतरपणे मोफत पाणीपुरवठा करून जनतेच्या समस्येचे निराकरण केले आहे.
बेळगाव तालुक्यातील राजहंसगड, सुळगा, अवचारहट्टी, यरमाळ, देसूर, झाडशाहपूर आदी भागात गेल्या साडेतीन महिन्यांपासून मोफत पाणीपुरवठा करून जनतेला दिलासा देण्याचे काम गोविंद टक्केकर यांच्यामाध्यमातून केले जात आहे. अभियंते आणि उद्योजक असलेले गोविंद टक्केकर यांनी समाजसेवेचा वसा घेतला असून मोफत पाणीपुरवठा करून त्यांनी समाजसेवेचा वेगळा ठसा उमटवला आहे.
केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर वैयक्तिक कार्यक्रम, यात्रा, धार्मिक कार्यक्रमांसाठीही निरंतरपणे ते मोफत पाणीपुरवठा करत आहेत. बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विविध ठिकाणच्या श्री महालक्ष्मी यात्रेतदेखील त्यांनी मोफत पाणीपुरवठा केला आहे. २० फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आलेला मोफत पाणीपुरवठ्याचा उपक्रम आजही निरंतरपणे सुरु आहे.
७ गावांसाठी तब्बल ४८ टँकरद्वारे ते पाणीपुरवठा करत असून जनतेने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. जनतेला मूलभूत सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधींचे काम गोविंद टक्केकर यांच्यामाध्यमातून केले जात असून स्वखर्चातून जनतेला पाण्याची व्यवस्था करून देणाऱ्या गोविंद टक्केकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे.