बेळगाव लाईव्ह :बेळगाव टेबल टेनिस अकॅडमीची उदयोन्मुख होतकरू टेबल टेनिसपटू तनिष्का काळभैरव हिने नुकतेच 2024-25 हंगामासाठी प्रतिष्ठित तिभार जर्मनी या कंपनीचे प्रायोजकत्व मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. सदर प्रतिष्ठेचे प्रायोजकत्व मिळविण्याचे तनिष्का हिचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
टेबल टेनिस खेळामध्ये कर्नाटक राज्यामध्ये मुलींच्या 13 वर्षांखालील गटाचे प्रथम मानांकन प्राप्त असलेली तनिष्का सध्या माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू संगम बैलूर यांच्या बेळगाव टेबल टेनिस अकादमीमध्ये सराव करण्याबरोबरच प्रशिक्षण घेत आहे.
सारब्रुकेन येथे स्थित तिभार ही एक जगप्रसिद्ध जर्मन टेबल टेनिस निर्माता कंपनी आहे. या कंपनीने व्लादिमीर सॅमसोनोव्ह, डार्को जॉर्गिक आणि बर्नाडेट स्झोक्स सारख्या जगातील अव्वल खेळाडूंना प्रायोजित केले आहे.
याखेरीज विविध राष्ट्रीय संघांना आणि प्रमुख क्लबना, जसे की सारब्रुकेनमधील 1. एफसीएस टीटी यांना त्यांचे समर्थन दिले आहे. केवळ खेळाडूंपुरते मर्यादित न राहता तिभार जागतिक चॅम्पियनशिप, युरोपियन चॅम्पियनशिप, डब्ल्यूटीटी आणि युरोप टॉप 16 यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांसाठी अधिकृत उपकरणे प्रायोजक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
अशा या जागतिक कीर्तीच्या कंपनीचे सलग दुसऱ्या वर्षी प्रायोजकत्व लाभणे ही अभिमानास्पद बाब असल्यामुळे तनिष्का काळभैरव हिचे टेबल टेनिस क्षेत्रासह सर्वत्र कौतुक होत आहे.